
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरती प्रक्रियेविरोधात कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बारगे यांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयावर कडाडून टीका करत, हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ नोव्हेंबर : एसटी महामंडळात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्याचा घाट घातला जात असून, या निर्णयामुळे नियमित व पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप कामगार नेत्यांकडून करण्यात येत आहे. महामंडळातील नोकऱ्यांमध्ये खाजगीकरण किंवा कंत्राटी पद्धत राबवणे एसटी आणि कामगारांच्या हिताचे नाही, असे स्पष्ट करत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने याविरोधात एल्गार पुकारला आहे.
कंत्राटी भरतीमुळे कामगारांचे शोषण वाढणार
एसटी महामंडळासारख्या जनसामान्यांच्या जीवनवाहिनी असलेल्या सार्वजनिक संस्थेत पारदर्शक आणि नियमानुसार कायमस्वरूपी भरती होणे गरजेचे आहे. मात्र, त्याऐवजी कंत्राटीकरणाचा मार्ग स्वीकारल्यास कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक शोषण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने हा वादग्रस्त निर्णय तत्काळ रद्द करून महामंडळातील रिक्त पदांवर नियमानुसार सरळसेवा व कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा कामगार संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व कायदेशीर लढा उभारला जाईल, असा इशारा श्रीरंग बारगे यांनी दिला आहे.





