शिधाधारकांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसीची सक्ती; अन्यथा स्वस्त धान्य होणार बंद!

रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत असून ही प्रक्रिया न केल्यास मोफत व स्वस्त धान्य मिळणे बंद होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ११ सप्टेंबर : सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभागाने सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. शिधापत्रिकेत नोंद असलेल्या प्रत्येक सदस्याला ३० सप्टेंबरपूर्वी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दिलेली मुदत संपण्यापूर्वी ही पडताळणी पूर्ण न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डवरून वगळले जाण्याची आणि स्वस्त धान्य मिळणे बंद होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

रास्त भाव दुकानांवर पॉस मशीनद्वारे ई-केवायसीची सोय

रेशन कार्डमधील बोगस अथवा अपात्र लाभार्थ शोधून काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी नागरिकांना आपल्या जवळच्या रास्त भाव धान्य दुकानात (Ration Shop) जावे लागेल. तेथे उपलब्ध असलेल्या पॉस (PoS) मशीनवर फिंगरप्रिंट अथवा बायोमेट्रिक पडताळणीद्वारे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी सहजतेने पूर्ण करता येईल. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क देण्याची गरज नाही.

मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

अनेक रेशन कार्डवर मृत व्यक्ती, दुबार नावे अथवा स्थलांतरित नागरिकांची नावे अद्याप कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. या तांत्रिक त्रुटी दूर करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. ३० सप्टेंबरनंतर ई-केवायसी न झालेल्या सदस्यांचे धान्य थांबवण्यात येणार असल्याने, सर्व शिधाधारकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!