देशी गोवंश पालकांसाठी ५ लाखांचे बक्षीस; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. देशी गोवंश पालकांना पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असून १० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

स्थैर्य, राजाळे, दि. ११ ऑगस्ट : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा ‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. देशी गाई आणि म्हशींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांसह दुग्ध सहकारी संस्थांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून पहिल्या क्रमांकासाठी पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप आणि श्रेणी

देशी गाई-म्हशींचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करणारे शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उत्पादक संघटनांना या पुरस्काराने गौरवले जाणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ३ लाख आणि तृतीय क्रमांकासाठी २ लाख रुपये रोख, गुणवत्ता प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. ईशान्य आणि हिमालयीन राज्यांसाठी २ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार असेल. तसेच कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पात्र पशुपालक आणि संस्थांना १० सप्टेंबरपर्यंत awards.gov.in किंवा dahd.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरता येतील. राष्ट्रीय दुग्ध दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!