
कोळकी पंचायत समिती गणातील विविध गावांमध्ये २२९ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे अनेक गरजू कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य, कोळकी, दि. ११ ऑगस्ट : कोळकी पंचायत समिती गणातील विविध गावांमध्ये तब्बल २२९ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. पंचायत समिती सदस्य विकास नाळे यांनी ही माहिती दिली असून, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
गावनिहाय घरकुलांची मंजुरी
कोळकी पंचायत समिती गणांतर्गत येणाऱ्या अनेक गावांना या योजनेचा मोठा फायदा झाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या मंजुरीनुसार कोळकी गावात ४०, सोनवडी बुद्रुकमध्ये ३५, भाडळी बुद्रुक ८, भाडळी खुर्द ५३, धुमाळवाडी २७, गिरवी ४४ आणि बोडकेवाडी येथे २२ अशा एकूण २२९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
गणातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. याकामी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे विकास नाळे यांनी स्पष्ट केले.