पुसेगाव-खटाव मार्गावरील पूल धोकादायक; संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची मोठी भीती, प्रशासनाचे दुर्लक्ष


पुसेगाव-खटाव राज्यमार्ग क्रमांक १४६ वरील पुलांचे काम पूर्ण होऊन ४ वर्षे उलटली तरी अद्याप संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नाहीत. यामुळे पूल धोकादायक बनले असून नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

स्थैर्य, पुसेगाव (सातारा), दि. ६ : पुसेगाव-वडूज-कातरखटाव रस्ता (राज्यमार्ग क्रमांक १४६) वरील पुसेगाव ते खटाव या मार्गावरील पुलांचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम पूर्ण होऊन सुमारे चार वर्षे लोटली आहेत. मात्र, या मार्गावरील काही पुलांचे संरक्षक कठडे बांधण्याचे काम अजूनही अपूर्णच असल्याने हे पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनले आहेत. ‘एखादा मोठा आणि गंभीर अपघात झाल्यावरच संबंधित प्रशासनाला जाग येणार का?’, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कठड्यांअभावी अपघातांचा धोका

पुसेगाव ते खटाव या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. पूर्वीदेखील या रस्त्यावरील पुलांना संरक्षक कठडे नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात घडल्याच्या घटना ताज्या आहेत. रस्त्याचे नव्याने काम करताना पुलांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात आले, मात्र हे काम करत असताना काही पुलांना संरक्षक कठडेच बांधण्यात आले नाहीत. तर काही ठिकाणी केवळ नाममात्र छोटे कठडे बांधल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

रात्री आणि पावसाळ्यात मोठी भीती

या मार्गावरील ओढ्यांवर असलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना रस्त्यालगत तब्बल १५ ते २० फुटांचे खोल खड्डे आहेत. संरक्षक कठडे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अनवधानाने वाहने पुलावरून खाली खड्ड्यात कोसळण्याची मोठी भीती असते. तसेच पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यावर ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते. गेली कित्येक वर्षे हीच धोकादायक स्थिती कायम असल्याने, नव्याने बांधलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना त्वरित सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उंचीचे संरक्षक कठडे उभारावेत, अशी तीव्र मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.

“पुसेगाव आणि परिसरात नव्याने बांधलेल्या काही पुलांना संरक्षक कठडे बांधले गेलेले नाहीत. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील काही पुलांनाही केवळ नाममात्र कठडे बांधले आहेत. यामुळे येथील वाहतूक जीवघेणी व धोकादायक ठरत असून, अपघाताची शक्यता बळावली आहे.”

– संतोष जाधव (माजी ग्रामपंचायत सदस्य, पुसेगाव)


Back to top button
Don`t copy text!