
हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहावे.
स्थैर्य, मुंबई, दि. ०१ जुलै : भारतीय हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दोन्ही जिल्ह्यांतील घाटमाथ्यासाठी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला असून, नागरिकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले आहे.
घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे घाट परिसरात २, ३ आणि ४ जुलै रोजी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सलग तीन दिवस ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच सातारा घाट परिसरात ५ जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सातारा घाट परिसरात १ ते ४ जुलै दरम्यान सलग ‘ऑरेंज अलर्ट’ असणार आहे. या काळात दोन्ही जिल्ह्यांतील उर्वरित भागांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दरडी कोसळण्याचा मोठा धोका
अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा (Landslides) मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक कोंडी व रस्त्यांची माहिती तपासूनच प्रवास करावा, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भात शेती आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमधून अतिरिक्त पाणी त्वरित बाहेर काढावे. तसेच, पशुपालकांनी मुसळधार पावसाच्या वेळी आपल्या जनावरांना सुरक्षित गोट्यात ठेवावे. हवामानाची परिस्थिती पाहता सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थानी राहावे, असे आवाहन राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.
