दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । सातारा । ‘‘युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकीक कार्याला उजाळा देण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आलेले ‘श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकीचा इतिहास’ हे पुस्तक विशेषत: युवकांनी वाचावे; त्यातून त्यांना शिवकालातील अनेक घटनाक्रमांचा वस्तुनिष्ठ उलगडा होईल’’, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
फलटण येथील इतिहास अभ्यासक राहुल उर्फ पोपटराव बर्गे यांच्या ‘श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकीचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन सातारा येथील ‘जलमंदीर पॅलेस’ येथे खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले; त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, जलमंदिर कार्यालय प्रमुख अरविंद दामले, इतिहास प्रेमी अभिजीत सूर्यवंशी, विजयसिंह बर्गे, लेखक पोपटराव बर्गे उपस्थित होते.
‘‘सुमारे दोन वर्षांहून अधिक काळ परिश्रम घेवून या पुस्तकात ऐतिहासिक माहितीचे संकलन पोपटराव बर्गे यांनी केले आहे. युवकांनी इतिहास अभ्यास व लेखनात पुढे येणे गरजेचे आहे’’, असेही खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगून बर्गे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुस्तक निर्मितीविषयी आस्थेने विचारपूस केली.
आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रकाशन
दरम्यान, सदर पुस्तकाचे प्रकाशन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते त्यांच्या सातारा येथील ‘सुुरुची’ या निवासस्थानी देखील संपन्न झाले. ‘‘पोपटराव बर्गे यांनी चिकाटी व मेहनतीने आणि छत्रपती शिवरायांच्या श्रद्धेपोटी इतिहासप्रेमात राहून संकलन व लेखन केलेले हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे’’, अशी सदीच्छा व्यक्त करुन बर्गे यांना शुभेच्छा दिल्या.