आंदोलकांनी दिल्ली कूच करण्यास 100 दिवस पूर्ण; प्रत्येक तिसरा मंत्री, 216 खासदार शेतकरी, सरासरी संपत्ती 18 काेटी


स्थैर्य,नवी दिल्ली,दि. ६:  दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला आता १०० दिवस पूर्ण झाले. तीन नव्या कृषी कायद्यांस मागे घेण्याबाबत विविध मागण्यांबाबत २५ नाेव्हेंबर राेजी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सरहद्दीवर डेरा टाकला हाेता. सरकार व शेतकरी यांच्यात या मुद्यावरून ११ वेळा चर्चा झाली. आंदाेलन व संघर्षादरम्यान १०० हून जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. १०० हून जास्त तुरुंगात आहेत. ३०० पाेलिसही जखमी आहेत. परंतु अद्यापही सगळ्या गाेष्टी शेताच्या बांधावर अजूनही जशास तशाच आहेत. हा गुंता काही सुटलेला नाही. संसदेत हा मुद्दा मांडण्यात आला. तेव्हाही खूप वादंग उठले. तेथे अनेक नेत्यांनी स्वत:ची आेळख शेतकरी आहे, अशी सांगितली. त्यानंतर भास्करच्या टीमने शेतकरी खासदारांचे आकडे शाेधून काढण्याचा प्रयत्न केला. तेथे वास्तव वेगळेच दिसले. संसदेत ५४३ जागा आहेत. त्यापैकी पाच जागा रिक्त आहेत. ५३८ जागी नेते आहेत. त्यापैकी २१६ खासदारांनी सरकारी कागदपत्रांवर स्वत:चा व्यवसाय शेतकरी असा सांगितला. परंतु शेतकरी बनलेले नेते व शेतकऱ्यांची कमाई पाहिल्यास आणखी भीषण चित्र दिसू लागते. देशात शेतकरी महिन्याला ८, ९३१ रुपये कमावताे. हे आकडे सरकारच्या नाबार्डचे आहेत. खासदारांना सर्व सुविधांसह महिन्याला २.०३ लाख रुपये वेतन मिळते. सध्या काेराेनामुळे त्यात घट झाली.

अमित शहादेखील शेतकरी
आतापर्यंत आपण महिन्याच्या वेतनाबद्दल पाहिले. आता संपत्तीचे पाहूया. माेदी सरकारमध्ये एकूण ५३ मंत्री आहेत. त्यात २१ कॅबिनेट व ३२ राज्यमंत्री आहेत. २१ कॅबिनेट मंत्र्यांपैकी ७ शेतकरी आहेत. ३२ राज्यमंत्र्यांपैकी १३ शेतकरी आहेत. शेतकरी मंत्र्यांमध्ये अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या नावांचा समावेश आहे. अमित शहा कॅबिनेट मंत्र्यांपैकी सर्वात श्रीमंत शेतकरी आहेत. त्यांच्याकडे ४०.३२ काेटींहून जास्त संपत्ती आहे. देशाच्या प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी १.०८ हेक्टरची शेतजमीन आहे. परंतु सरकारच्या प्रत्येक शेतकरी मंत्र्याकडे यापेक्षा जास्त जमीन आहे. सर्वाधिक १२.२८ हेक्टर शेतजमीन नितीन गडकरी यांच्याकडे आहे.

जास्त विराेध हाेणाऱ्या पंजाबमध्ये कमाई जास्त
कृषी कायद्यांना सर्वाधिक विराेध पंजाब, हरियाणात हाेत आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची देशात सर्वाधिक कमाई आहे. त्यांची महिन्याची सरासरी कमाई २३,१३३ रुपये आहे. हरियाणातील शेतकऱ्यांची सरासरी कमाई १८,४९६ रुपये आहे. दोन्ही राज्यांतील २३ खासदारांपैकी केवळ ६ खासदारांनी स्वत:चा कृषी व्यवसाय असल्याचे नमूद केलेले आहे. ४ पंजाब तर २ हरियाणाचे आहेत. त्यांची सरासरी संपत्ती ८२ कोटी आहे.


Back to top button
Don`t copy text!