दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२३ । मुंबई । “ ‘महारेरा’ कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शकपणे व नियमित करणे ही या कायद्याची महत्त्वाची उद्दिष्ट्ये आहेत”, अशी माहिती महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
महारेरा हा “ग्राहकाभिमुख” कायदा असून या कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला पायबंद घातला जाणार आहे. भूखंड, अपार्टमेंट, इमारत तसेच कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पाच्या खरेदी आणि विक्रीमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी हा कायदा महत्वाची भूमिका पार पाडत आहे. या कायद्यानुसार बांधकाम व्यावसायिकांना आपल्या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा, परवानग्या व इतर आवश्यक कागदपत्रे महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मोठमोठ्या आकर्षक व अवास्तव जाहिराती करुन ग्राहकास भूलवणे अशक्य होणार आहे. ग्राहक आणि बांधकाम व्यवसाय यावर या कायद्यामुळे कसा परिणाम होऊ शकतो, ग्राहकांनी घर खरेदी करतांना कोणत्या नियमांचे काटेकोरपणे वाचन व पालन केले पाहिजे अशा विविध विषयांवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती डॉ. प्रभू यांनी दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत, गुरुवार दि. 27 एप्रिल 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या पुढील समाजमाध्यमांच्या लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR