दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२३ । मुंबई । शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत राज्यातील संस्थांना विशेष अर्थसहाय्य योजना राबविणे आणि योजनेचे स्वरूप निश्चित करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, नियोजन विभागाचे उपसचिव श्री. महाजन, पणन विभागाचे उपसचिव सुग्रीव धपाटे, पणन मंडळाचे संजय कदम, पणन मंडळाचे सहसंचालक मधुकांत गरड संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर शेतमालाला अधिक दर मिळण्यास मदत होईल. शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पणन महामंडळाला या बैठकीत दिल्या.