अनोळखी, संशयित व्यक्तिची ओळख पटल्याशिवाय राहण्यास परवानगी देण्यास बंदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | पंढरपूर | जिल्ह्यातील सर्व लॉज, हॉटेल, फ्लॅट, दुकाने, घरमालक, प्रॉपर्टी डिलर/ब्रोकर/एजंट, जुने घर खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच भाड्याने घर देणारे व्यक्ती व संस्था, धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांनी सतर्कता बाळगण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीरनामा निर्गमित केला आहे.

जाहीरनाम्यात म्हटले आहे, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारी यात्रा दि.20/06/2023 ते दि.04/07/2023 या कालावधीत भरत आहे. दि.21/06/2023 रोजी संत श्री गजानन महाराज, दि.23/06/2023 रोजी संत श्री ज्ञानेश्वर महाराज, दि. 24/06/2023 रोजी संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतात.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकरी सांप्रदायातील तसेच इतर भाविकांचे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने आषाढीवारीस संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर प्रांतातून भाविक लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. यात्रेस 12 ते 14 लाख भाविक वारकरी पंढरपूर येथे येतात. या धार्मिकदृष्या अत्यंत महत्वाच्या व मोठ्या यात्रेत एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडु नये, जिल्ह्यात नवीन राहण्यासाठी येणारे व्यक्ती, यांची माहिती असणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या स्थळ सीमा हद्दीत जी जी व्यक्ती नव्याने राहण्यास येईल त्या व्यक्तीस व जे कोणी अशा व्यक्तीस राहण्यास जागा उपलब्ध करून देईल, असे घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजन्ट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा इत्यादिंचे विश्वस्त यांना अशा अनोळखी नवीन रहावयास आलेल्या व्यक्तिंची त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती न चुकता तो राहावयास आल्यानंतर किंवा विचारपूस केल्यावर लगेच संबंधित पोलीस स्टेशनला देणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या दखाद्या दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध होवु शकतो व सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास साह्य होईल. तसेच लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होवून सार्वजनिक शांतता वाढीस लागण्यास बळ मिळेल.

तरी जिल्ह्यातील सर्व लॉज, हॉटेल, फ्लॅट, दुकाने, घरमालक, प्रॉपर्टी डिलर/ब्रोकर/एजंट, जुने घर खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच भाड्याने घर देणारे व्यक्ती व संस्था, धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे.

आषाढीवारी कालावधीत फ्लॅट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशिद, मंदिर व खाजगी निवासस्थाने या ठिकाणी अनोळखी अथवा संशयित इसमास त्याची ओळख पटवल्याशिवाय राहण्यास परवानगी देवू नये. भाडेकरूकडून रहिवाशी व ओळख असलेला पुरावा इत्यादि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घ्याव्यात. आषाढीवारी कालावधीत स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थ सोबत बाळगू नये. तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.

हा आदेश हा दि.20/06/2023 ते दि.03/07/2023 (दोन्ही दिवस धरुन) सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहील.


Back to top button
Don`t copy text!