वेळेत कर्जफेड आणि व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे संस्थेची प्रगती – सुभाषराव देशपांडे

श्री सद्गुरू हरिबुवा महाराज पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२४ | फलटण | मुगुटराव कदम |
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जो अर्थपुरवठा केला गेला, त्यामुळे असंख्य कुटुबांचे प्रपंच उभे राहिले आहेत. कर्जदाराचे राहणीमान त्यामुळे उंचावले आहे. एखाद्या संस्थेची प्रगती होत असताना त्यामध्ये संचालक मंडळाचे अचूक नियोजन, कर्मचार्‍याचा प्रामाणिकपणा, कर्ज घेणार्‍या व्यक्तीची पत, त्याने वेळेत फेडलेले कर्ज या बाबींचा समावेश होतो, असे प्रतिपादन जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे माजी प्राचार्य सुभाषराव देशपांडे यांनी केले.

श्री सद्गुरू हरिबुवा महराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. तेजसिंह दि. भोसले होते.

याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. राजाराम फणसे (काका), संचालक श्री. तुषारभाई गांधी, श्री. सुभाषराव नरळे, श्री. चंद्रकात बर्गे, श्री. धर्माजी भोसले, श्री. विक्रांत कदम, सौ. स्वाती फुले, श्री. प्रभाकर भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन श्री. रणजितसिंह दि. भोसले, कुक्कुटपालन संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. मानाजीराव चव्हाण, संस्थेच्या लोणंद, दहिवडी, म्हसवड, कोरेगाव, सातारा, शिरवळ, वाई या शाखांचे कार्यकारी समिती सदस्य व शाखाप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते श्री हरिबुवा महाराज व सहकार महर्षी कै. हणमंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले. प्रारंभी दिवंगत माजी सैनिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व इतर दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित प्रमुख अतिथी, संचालक मंडळातील पदाधिकारी, सदस्य व उपस्थित शाखा कार्यकारी समितीचे सदस्य यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करणेत करण्यात आला.

प्रारंभी सरव्यवस्थापक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व सभेपुढील १४ विषय वाचन केले. विषयपत्रिकेतील १ ते १३ विषयांवर साधकबाधक चर्चा होऊन तसेच सभासदांकडून आलेल्या शंकांना, प्रश्नांना सरव्यवस्थापक व चेअरमन यांनी समर्पक खुलासा करून दिल्यानंतर सदरचे विषय एकापाठोपाठ एक आवाजी मतदानाने खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करणेत आले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यमान चेअरमन यांनी संस्थेच्या कार्याचा धावता आढावा घेताना सांगितले की, अहवाल सालच्या आर्थिक वर्षात सभासदसंख्या ६५१० असून सभासद संख्येत ५८७ ची वाढ झाली आहे. संस्थेचे भागभांडवल रु. ३ कोटी ९५ लाख असून, राखीव व इतर निधी ८ कोटी ९७ लाख आहे, संस्थेकडे ६७ कोटी ४० लाखांच्या ठेवी असून, रु. ५० कोटी ८२ लाख कर्ज वाटप आहे. संस्थेची ३० कोटी ९६ लाख गुंतवणूक आहे. संस्थेस एकूण नफा रु. १ कोटी २१ लाख इतका झालेला आहे. सभासदांना ११ टक्के लाभांश मंजूर करणेत आला आहे. संस्थेच्या सेवकांच्या चिकाटीमुळेच हे यश संपादन झाले, असे चेअरमन यांनी नमूद केले.

कामकाजामध्ये संचालक मंडळाचे सहकार्य लाभते, संस्थेच्या दैनंदिन व्यवहारात सेवकवर्ग सचोटीने व प्रामाणिकपणे कार्य करीत आहे, याचे त्यांनी कौतुक केले. ग्राहक सेवा व सुविधा यांचा उहापोह चेअरमन यांनी केला. संस्थेस सलग १४ वर्षे ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. संस्था सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबविते, याचा धावता आढावा त्यांनी घेतला. ‘विनासहकार नाही उध्दार’ या उक्तीप्रमाणे व सहकाराच्या चौकटीत राहून संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये समूहातील इतर संस्था, संस्थेमधील कार्यरत सर्व घटक, ब्लड बँक, के के हॉस्पिटलचे कर्मचारी, लेखापरीक्षक, कायदेशीर सल्लागार यांचेही योगदान आहे. कोविड काळात फलटण येथे शिवाजी महाराज कोविड सेंटर उभारून संस्थेने अनेकांचे प्राण वाचविले, याची त्यांनी आठवण करून देत सर्वांविषयी आभार व्यक्त केले.

माजी प्राचार्य देशपांडे पुढे म्हणाले की, नियमित कर्जफेड केल्याने कर्जदारावरील संस्थेचा विश्वास वृध्दिंगत होतो. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थापक अध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले यांच्यासह इतर घटकांचे कामकाजात असलेले सहकार्य यांची त्यांनी जाणीव करून दिली. संस्थेचे ३६ वर्षाचे कामकाज पाहता संस्था स्थापनेचा हेतू सफल झाला आहे, अशी त्यांनी कबुली दिली.

सभेचे औचित्य साधून संस्थेचे संचालक विक्रांत कदम, प्रा. सतीश जंगम यांनी विचार व्यक्त केले. संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. राजाराम फणसे यांनी समारोप केला. ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!