प्रीतम सातपुते यांना पुणे जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान


दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | बारामती |
पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ९ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणार्‍या ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३’चे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आठफाटा येथील प्रीतम सातपुते यांना बारामती तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड बोरी पारधी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी बारामती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संपत गावडे, आठफाटा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती धावडे उपस्थित होत्या.

सातपुते यांना यावर्षीचा ‘शिक्षण माझा वसा‘ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारदेखील कला विभागातून मिळालेला आहे. एस. सी. ई. आर. टी. मार्फत घेण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पोस्टर निर्मिती स्पर्धेमध्ये सुद्धा सातपुते यांना जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांक मिळालेला आहे. पुणे डाएटमार्फत आयोजित शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेमध्येसुद्धा सातपुते यांना ‘रांगोळीतून शिक्षण – चला रांगोळी रेखाटूया’ या विषयात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. पुणे डाएटकडून राबवलेल्या मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित पोस्टर निर्मिती, काव्य निर्मिती तसेच रांगोळीमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. रांगोळीतून विविध शैक्षणिक, सामाजिक संदेश त्या देतात.

सातपुते यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम –

जो दिनांक तो पाढा, गोष्टींचा शनिवार, कृतीतून शिक्षण, ज्ञानरचनावादी अध्यापन, शैक्षणिक दहीहंडी, पाढे पाठांतर, चला स्पेलिंग तयार करूया, माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा, शालेय परसबाग, स्वच्छ भारत अभियान, निपुण भारत, विद्या प्रवेश यांसारखे उपक्रम शाळेत राबवले जातात. स्वतःच्या ‘स्मार्ट गुरू’ या यूट्यूब चॅनलवरून वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली आहे. यापूर्वी ४ थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत त्यांचे विद्यार्थी आलेले आहेत.

यावर्षी मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये आठवडा शाळेतील एका विद्यार्थिनीची केंद्रातून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. अशाप्रकारे सातपुते यांनी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सदर पुरस्कार देण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!