फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची पूर्वतयारी; सर्व विभागांनी समन्वय ठेवण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश


स्थैर्य, फलटण, दि. २ जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत पालखी मार्गावरील कामे आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सोहळ्याला अगदी काही दिवस उरले असल्याने हे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी पालखी शहरात येण्यापूर्वी रस्त्याचे सुरू असलेले काम पूर्ण करण्याची ग्वाही बैठकीत दिली.

पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना आणि दिंडी प्रमुखांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी दिले.

या बैठकीला तहसीलदार अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल जाधव, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते. तसेच नगरसेवक संदीप चोरमले, किरण राऊत, सिद्धाली शहा, मीना काकडे, रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर आणि सचिन अहिवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!