ढाबे आणि गोदामांमधील अवैध गॅस उतराईवर कठोर कारवाईचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

एलपीजी टँकरमधून ढाबे आणि अनधिकृत गोदामांत गॅसची अवैध उतराई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २० नोव्हेंबर : एलपीजी आणि अन्य ज्वलनशील वायूंची टँकरमधून ढाबे अथवा अनधिकृत गोदामांमध्ये होणारी अवैध उतराई आणि चोरी सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे. अशा अवैध ठिकाणांवर पोलीस आणि संबंधित विभागांनी तातडीने कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मंत्रालयात ट्रक, टँक आणि बल्क एलपीजी वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जप्त टँकर लवकर सोडण्यासाठी कायदेशीर पर्यायांची तपासणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांच्या प्रतिनिधींनी ज्वलनशील पदार्थांची अवैध उतराई आणि चोरीचा मुद्दा बैठकीत मांडला. प्रशिक्षित मनुष्यबळाशिवाय ढाबे किंवा गोदामांत गॅस उतरवल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे अवैध उतराई करणारे चालक आणि माल स्वीकारणारे गोदाम मालक यांच्यावर कडक कारवाई करण्यास सरनाईक यांनी सांगितले. तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत जप्त केलेले टँकर दीर्घकाळ अडकून राहत असल्याने वाहनमालकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रतिज्ञापत्र, हमीपत्र किंवा बाँड घेऊन वाहने तात्काळ सोडण्याच्या कायदेशीर तरतुदी तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महामार्गांवर तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाइन आणि झिरो एफआयआर

समृद्धी महामार्गासह राज्यातील प्रमुख महामार्गांवर अपघात किंवा वाहन बिघाडाच्या वेळी तात्काळ मदत मिळावी, यासाठी प्रत्यक्ष वेळेत कार्यरत असलेली राज्यस्तरीय हेल्पलाइन, प्रभावी गस्त आणि तंत्रज्ञानाधारित यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. याशिवाय, अपघातग्रस्त किंवा प्रवाशांची तक्रार कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवता यावी, यासाठी ‘झिरो एफआयआर’च्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत अद्ययावत सूचना जारी कराव्यात, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!