अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोठी हालचाल; नागपूर अधिवेशनावर धडकणार दोन विराट मोर्चे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

अनुसूचित जातीमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १० आणि १७ डिसेंबर रोजी विधानभवनावर दोन मोठे मोर्चे निघणार आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २० नोव्हेंबर : अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. उपवर्गीकरणाच्या नावाखाली शिक्षण, नोकरी आणि पदोन्नतीतील वंचितांचे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत नागपूरच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर दोन भव्य मोर्चे काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही मोर्चांमध्ये राज्यभरातून लाखो नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

१० डिसेंबरला एल्गार मोर्चाचे आयोजन

उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि इतर ८० सामाजिक, कामगार व विद्यार्थी संघटनांच्या वतीने १० डिसेंबर रोजी विधानभवनावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रा. देविदास घोडेस्वार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील बानाई सभागृहात पार पडलेल्या बैठकीत या मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून, राज्यभरातून सुमारे सात लाख नागरिक या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.

१७ डिसेंबरला कृती समितीचा आक्रोश मोर्चा

दुसरीकडे, आरक्षण उपवर्गीकरणविरोधी कृती समितीच्या वतीने १७ डिसेंबर रोजी विधानभवनावर दुसरा विराट आक्रोश मोर्चा काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. बानाई सभागृहात झालेल्या बैठकीला विदर्भातील विविध जिल्ह्यांतील ५९ अनुसूचित जातींचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्तावित उपवर्गीकरण धोरणाच्या घटनात्मक व सामाजिक परिणामांवर चर्चा केल्यानंतर १७ डिसेंबरच्या मोर्चात पाच लाख नागरिक सहभागी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!