बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळेत मोठा बदल, वाचा सुधारित वेळ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळेत बदल केला असून, १७ फेब्रुवारी रोजी हा पेपर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २० नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार अर्थशास्त्राची परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्रात घेतली जाणार असून, हा पेपर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडेल. यापूर्वी हा पेपर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नियोजित होता, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.

इतर विषयांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही

पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. अर्थशास्त्र विषयाची वेळ वगळता दहावी आणि बारावीच्या इतर सर्व विषयांच्या तारखा आणि वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahahsscboard.in) सविस्तर वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अधिकृत वेळापत्रकाचीच खातरजमा करण्याचे आवाहन

संकेतस्थळावर दिलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित वेळापत्रकावर विश्वास न ठेवता आपल्या महाविद्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत वेळापत्रकाची खातरजमा करावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!