महसूल कर्मचारी व नामवंत क्रिकेटपटू प्रशांत साबळे यांचे हृदयविकाराने आकस्मित निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण महसूल विभागातील कर्मचारी आणि तालुक्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रशांत साबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने फलटणच्या क्रीडा आणि प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ जानेवारी : फलटण महसूल विभागातील कार्यरत कर्मचारी आणि फलटणच्या क्रिकेट विश्वातील एक उमदे व्यक्तिमत्त्व प्रशांत साबळे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. अत्यंत कमी वयात आणि अचानक ओढवलेल्या या घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, क्रीडा व महसूल क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

प्रशांत साबळे हे केवळ शासकीय सेवेतच तत्पर नव्हते, तर मैदानावरही त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. फलटण तालुक्यातील नामवंत क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख होती. क्रिकेटमधील त्यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तरुण वर्गात आणि क्रीडाप्रेमींमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. महसूल विभागातील कामाचा व्याप सांभाळून त्यांनी आपली क्रिकेटची आवड जोपासली होती.

आज त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच फलटण महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र हळहळ व्यक्त केली. एक हरहुन्नरी खेळाडू आणि मनमिळाऊ कर्मचारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात परिवार आणि मित्रपरिवार असा मोठा गोतावळा आहे. त्यांच्या निधनामुळे फलटणच्या सामाजिक आणि क्रीडा जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!