
दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । शाळा,महाविद्यालयांना उन्हाळी सुटी लागल्याने नागरिक पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. त्याचबरोबर सध्या यात्रा व लग्न समारंभाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीत वाढ होऊन सातारा शहर परिसरातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
सीएनजी पंपावर सीएनजीचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने वाहनांमध्ये सीएनजी भरण्यासही अधिकचा वेळ लागत आहे.महामार्गावरील सीएनजी केंद्रावर दररोज पहाटेपासून रिक्षाचालक, प्रवासी वाहने रांगा लावत उभी असतात. त्यामुळे अनेक वेळावाहनचालकांमध्ये बाचाबाचीदेखील होत असते. एका केंद्रावर जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावरून वाहने सीएनजी भरण्यासाठी येत असतात.
जवळपास सीएनजी केंद्र नसल्याने मोठ्या रांगा लागतात. अनेक वेळा सीएनजी संपतो, तर काही वेळा मुख्य सीएनजी केंद्रातून पुरवठा वेळेवर होत नाही. वाहनांच्या रांगा लांबच लांब लागत असल्याने बर्याचदा या रांगा रस्त्यावर लागलेल्या असतात. त्यामुळे महामार्गावरून भरधाव चालणारे वाहन सेवा रस्त्यावर येऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.