

स्थैर्य, फलटण, दि. २ जून : फलटण येथील हॉटेल सेलिब्रेशनमध्ये जगताप कुटुंबीय आणि फलटणच्या पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ संपादक बापूराव जगताप व ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बापूराव जगताप यांनी निस्पृह पत्रकारिता केली असून, पोपटराव मिंड यांचे व्यसनमुक्तीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बापूराव जगताप हे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करताना संस्थेविषयी तळमळ दाखवली. राजकारण, शिक्षण आणि समाजकारणासोबत त्यांनी सकारात्मक पत्रकारिता केली. सध्या समाजात केमिकल ड्रग्सची समस्या भीषण बनली आहे. या समस्येविरोधात पोपटराव मिंड करत असलेले व्यसनमुक्तीचे काम महत्त्वाचे असून आता सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
या सत्कार सोहळ्यासाठी फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नानासो इवरे आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता उपस्थित होते.
माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, बापूराव जगताप हे ग्रामीण भागातून संघर्षातून पुढे आले आहेत. ध्येयवादी नेतृत्वाच्या संगतीत व्यक्ती कशी घडते, याचे ते उत्तम उदाहरण आहेत. तसेच पोपटराव मिंड आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नेहमी वाचा फोडत असतात.
अरविंद मेहता म्हणाले, बापूराव जगताप यांनी ‘रामनगर’ आणि ‘रामआदेश’ वृत्तपत्रांच्या माध्यमातून तालुक्याचे राजकारण व विकास लोकांसमोर मांडला. तर पोपटराव मिंड यांनी खटाव तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करत आता फलटणमध्ये व्यसनमुक्तीचे उल्लेखनीय काम सुरू ठेवले आहे.
सत्काराला उत्तर देताना बापूराव जगताप म्हणाले, आपण संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विश्वासामुळे आणि प्रेरणेमुळे घडलो आहे. त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असून इथून पुढेही सार्थ ठरवू.
पोपटराव मिंड म्हणाले, फलटणमध्ये आल्यानंतर सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडून समाज घडवण्याचे आणि व्यसनमुक्तीचे कार्य भविष्यातही अखंडपणे सुरू ठेवणार आहे.
