लोकप्रिय कवी-गायक दिलराज पवार यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार जाहीर


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । मुंबई । आपल्या क्रांतिकारी लेखणीतून व गानकलेतून आंबेडकरी चळवळ व विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचे महत्वाचे कार्य करणारे सुप्रसिद्ध कवी तथा गायक दिलराज पवार यांना यंदाचा “राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या सच्चा कलावंतांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार देण्यात येतो, यंदा दिलराज पवार यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदें यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर, कवी-गायक विष्णू शिंदे, महागायिका कडूबाई खरात आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

सदर मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बौद्धजन पंचायत समिती, सम्यक कोकण कलासंस्था (रजि.), भारतीय बौद्ध महासभा, उमटे गावशाखा (अलिबाग), काव्यमंच कलासंस्था आदि मातब्बर संस्थांकडून दिलराज पवार यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे, “दिलराज पवार यांनी आपल्या क्रांतिकारी कलागुणांनी चळवळीची धगधगती मशाल नेहमीच पेटत ठेवली आहे, ज्या उमेदीने त्यानी आपलं योगदान आंबेडकरी कार्यास दिले ते वाखाणण्याजोगे आहे, आज त्या कार्याची दखल घेतली जात आहे यातच त्यांचे यश आहे, त्याना पूढील वाटचालीस शुभेच्छा” असे गौरवोद्गार बौद्धजन पंचायत समितीच्या साहित्य-कला-क्रीडा समितीचे अध्यक्ष तसेच कवी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी काढले तसेच “येणाऱ्या पिढ्यांच्या नसानसात आंबेडकरी चळवळीची विचारधारा रक्त म्हणून सळसळत रहावी ही काळाची गरज आहे त्याकरता दिलराज पवार यांनी अथक परिश्रम घेतले आहेत त्यांचा आदर्श समोर ठेवून नव्या उमेदीच्या कलावंतानी ही पुढे यावे” असे गौरवोद्गार भारतीय बौद्ध महासभेचे अलिबाग तालुका सेक्रेटरी उत्तम रसाळ यांनी काढले आहेत.


Back to top button
Don`t copy text!