सीमेवर पोलिसांनी पकडला सव्वाचार कोटींचा मुद्देमाल, कोल्हापूर परिक्षेत्राची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२३ । कोल्हापूर । कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात पोलिसांनी ८८ लाखांच्या बेहिशोबी रकमेसह अवैध दारू, गुटखा, गांजा, संशयास्पद वाहने असा तब्बल चार कोटी ३५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात सात शस्त्रांचाही समावेश आहे. २४ एप्रिल ते ८ मे दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर दोन्ही राज्यातील पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सातत्याने बैठका घेऊन आणि दोन्ही राज्यातील अधिका-यांनी समन्वय ठेवून बंदोबस्ताचे नियोजन केले होते. कोल्हापूर परिक्षेत्राकडून कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यात सीमाभागात ४० तपासणी नाके सुरू केले होते. या नाक्यांवर २४ तास पोलिसांचा जागता पहारा होता.

१५ दिवसात तीन जिल्ह्यात पोलिसांनी ८८ लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त केली. त्याशिवाय २० लाख रुपये किमतीची ३५ हजार लिटर दारू, १९ किलो गांजा, दोन लाख ३३ हजार रुपयांचा गांजा पकडला. दारू, गांजा आणि संशयास्पद वस्तूंची तस्करी करणारी ११ वाहनेही पोलिसांनी जप्त केली.

अंमली पदार्थांच्या तस्करीसह मटका, जुगार अशा गुन्ह्यांमधील संशयित आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकणा-या २८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. तिन्ही जिल्ह्यातील ४० तपासणी नाक्यांवर एकूण दीडशे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात होते. यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत झाली, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!