मतदानाच्या एक दिवस आधी PM मोदींचे कर्नाटकातील जनतेच्या नावे पत्र, म्हणाले…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२३ । मुंबई । कर्नाटकात उद्या (10 मे) विधानसभेसाठी मतदान होणार आहे. राज्यात 38 वर्षांपासून सुरू असलेली सत्ताविरोधी लाट मोडून काढत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचे ध्येय सत्ताधारी भाजपने ठेवले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला एक पत्र जारी केले. पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओही शेअर केला, ज्यात त्यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. जाणून घ्या पंतप्रधान मोदींनी पत्रात काय लिहिले..?

मोदींचे कर्नाटकातील जनतेला पत्र
पीएम मोदींनी आपल्या पत्रात लिहिले की, तुम्ही माझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. तुमचे प्रेम मला दैवी वरदान वाटते. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण भारतीयांनी आपल्या प्रिय देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. कर्नाटक आपले व्हिजन साकार करण्यासाठी चळवळीचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. भारत ही पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आमचे पुढील लक्ष्य पहिल्या तीनमध्ये पोहोचण्याचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा कर्नाटक झपाट्याने वाढून $1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल. पत्रात त्यांनी आपल्या पक्षाची कर्नाटकातील जनतेशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

पंतप्रधानांनी पुढे लिहिले की, कोविड-19 महामारीच्या काळात कर्नाटकला भाजप सरकारच्या अंतर्गत परकीय गुंतवणुकीच्या रूपात वार्षिक 90,000 कोटी रुपये मिळाले. आधीच्या सरकारच्या काळात हे सुमारे 30,000 कोटी रुपये होते. आम्हाला कर्नाटकला गुंतवणूक, उद्योग आणि नवोन्मेषात नंबर-1 आणि शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेमध्ये नंबर 1 बनवायचे आहे. ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा, वाहतूक आणि नोकऱ्यांशी संबंधित चिंतेचे उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की कर्नाटकातील भाजप सरकार पुढील पिढीच्या शहरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, वाहतुकीचे आधुनिकीकरण, ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनमान सुधारण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले.

याशिवाय पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ संदेशही शेअर केला आहे. त्यात त्यांनी कर्नाटक राज्याला ‘नंबर-1’ करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहनही केले.

बंगळुरुमध्ये 26 किलोमीटरचा रोड शो 
शनिवारी (6 मे), पीएम मोदींनी राज्यातील भाजपच्या आक्रमक प्रचाराचा भाग म्हणून बंगळुरुमध्ये 26 किमीचा रोड शो केला. दरम्यान, राज्यात भाजपने 224, काँग्रेसने 223 आणि जेडीएसने 207 उमेदवार उभे केले आहेत. कर्नाटकात 5.2 कोटी पात्र मतदारांपैकी 9.17 लाख पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी (10 मे) मतदानाला सुरुवात होणार असून, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!