दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२३ | सातारा |
श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा दि.१८ ते २३ जून दरम्यान सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये येणार्या वारीमधील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास अगर पालखी सोहळ्यामध्ये उपद्रवी व्यतींकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताकरीता नेमलेले अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हेगारांना प्रतिबंध करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी तसेच सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, सहा. पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके असे एकूण सात वारकरी वेषातील पथके अंमलदारांसह तयार करून त्यांना दिवस-रात्र कामकाजाचे नियोजन करून दिले होते.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकांनी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण वारी सोहळ्यादरम्यान काही उपद्रवी व्यती हे वारीमध्ये चोरीच्या उद्देशाने पाकीट मारण्याच्या, बॅग चोरी अगर मौल्यवान वस्तू चोरण्याच्या इराद्याने संशयितरीत्या वावरताना तसेच वारीमध्ये बेशिस्तरीत्या वर्तन करताना मिळून आले. अशा एकूण ६६ जणांवर प्रतिबंधक कारवाई करून त्यांना श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान गंभीर स्वरूपाचा अपराध करण्यापासून प्रतिबंध केले.
पालखी सोहळ्यादरम्यान लोणंदमधील एक चेन चोरी खेरीज कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पालखी सोहळा शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.