प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्राची मोठी झेप; आठ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अनुदान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील नऊ लाखांहून अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून, आठ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २७ नोव्हेंबर : घरगुती वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील नऊ लाख नऊ हजार ११७ घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यातून तीन हजार ४४५.३१ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता निर्माण झाली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत आठ लाख ११ हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत सहा हजार ४१५.९० कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा करण्यात आले आहे.

नागपूर आघाडीवर; पुण्याची दुसरी कामगिरी

राज्यात सर्वाधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, तेथे एक लाख २८ हजार १५७ घरे सौरऊर्जेने जोडली गेली आहेत. पुणे जिल्ह्यात ६७ हजार ५९ घरांवर प्रकल्प कार्यान्वित झाले असून, पुण्याने राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. जळगाव जिल्हा ६२ हजार ३८५ घरांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा पहिल्या दहा जिल्ह्यांत समावेश आहे.

तीन किलोवॅट प्रकल्पासाठी ७८ हजारांचे अनुदान

या योजनेद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. एक किलोवॅट प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी कमाल ७८ हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते. गृहनिर्माण संस्थांनाही लिफ्ट व पार्किंगसारख्या सामायिक सुविधांसाठी प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. नेट मीटरिंगद्वारे अतिरिक्त वीज ग्रीडला पाठवण्याची सुविधा आणि बँकांकडून कर्ज मिळत असल्याने नागरिकांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!