राज्य मंत्रिमंडळाचे शिक्षण क्षेत्रासाठी ६ मोठे निर्णय; वसतिगृह भत्त्यात वाढ, खासगी शाळांसाठी नवा कायदा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांचा वसतिगृह भत्ता वाढवणे, खासगी अनुदानित शाळांसाठी नवा कायदा आणि ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगासह सहा मोठे निर्णय घेण्यात आले.

स्थैर्य, सातारा, दि. २६ नोव्हेंबर : राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध प्रस्तावांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

वसतिगृह निर्वाह भत्ता वाढ आणि ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत’ सुधारित दराने भत्ता दिला जाणार आहे. भोजन, निवास आणि दैनंदिन खर्चाच्या भत्त्यात भरीव वाढ केल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक भार हलका होणार आहे. तसेच, शासकीय महाविद्यालयांप्रमाणेच आता खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

खासगी शाळांसाठी नवा कायदा आणि विद्यापीठ अधिनियमांत सुधारणा

खासगी अनुदानित शाळांच्या कामकाजावर सर्वंकष नियंत्रण आणण्यासाठी ‘महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६’ चे प्रारूप तयार करून ते विधिमंडळात सादर करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. याशिवाय, शालार्थ प्रणालीत समाविष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत (एनबीएफसी) आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. दुसरीकडे, कुलसचिव नियुक्ती व विविध समित्यांच्या परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिनियमांत सुधारणा करण्यास व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील सुधारणा विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!