
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणच्या मुख्य रस्त्यालगत झाडावर दुर्मिळ ओरिएंटल स्कॉप्स घुबड दिसून आले असून, गणेश धुमाळ यांनी त्याचे नैसर्गिक हालचालींचे फोटो टिपले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 26 नोव्हेंबर : फलटणच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका झाडाच्या बुंध्यावर ओरिएंटल स्कॉप्स घुबडाचा दुर्मिळ नारिंगी प्रकार आढळून आला आहे. नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेयर सोसायटी फलटणचे वाइल्डलाइफ फोटोग्राफर गणेश धुमाळ जीडी आणि त्यांचे मित्र अनिकेत सोनवलकर यांनी हा अनुभव नोंदवला आहे.
परतीचा प्रवास आणि घुबडाची ओळख
पुण्यात वेडिंग शूट संपवून गणेश धुमाळ व अनिकेत सोनवलकर संध्याकाळी एका नवीन मार्गाने फलटणकडे परतत होते. वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा नियोजित बेत नसल्याने त्यांच्याकडे कॅमेरा किट नव्हते. प्रवासात फलटणच्या मुख्य रस्त्यालगतच्या झाडाच्या बुंध्यावर एक छोटे घुबड बसल्याचे लक्षात आल्यानंतर धुमाळ यांनी गाडी मागे घेतली आणि हेडलाईटच्या प्रकाशात पाहिले. सुरुवातीला ते ठिपकेवाला पिंगळा वाटले, मात्र छोटा आकार व वेगळा रंग पाहून त्यांनी गाडी कडेला उभी करून मोबाईल टॉर्चने तपासणी केली असता, तो ओरिएंटल स्कॉप्स घुबडाचा दुर्मिळ नारिंगी प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.
निरीक्षण आणि खाद्य सेवन
हे स्थलांतरित घुबड नवीन अधिवासात सहजासहजी दिसत नसल्याने कोणताही त्रास न देता गणेश धुमाळ यांनी शांतपणे त्याच्या हालचालींचे निरीक्षण केले. झाडाच्या आजूबाजूला असलेल्या खाजकुयलीच्या (कावच) काटेरी झुडपांवर मोठ्या प्रमाणात सुरवंट होते आणि घुबड निवांतपणे एक-एक सुरवंट खात होते. परिसरात कोणी आल्याची किंवा त्रास होण्याची पर्वा न करता ते खाण्यात मग्न होते.
कॅमेरा किटसह पुन्हा भेट आणि नोंद
आपल्या भागात हे घुबड पहिल्यांदाच दिसल्याचा आनंद आणि या दुर्मिळ नोंदीचा फोटोग्राफिक रेकॉर्ड ठेवण्याच्या उद्देशाने गणेश धुमाळ घरी गेल्यानंतरही स्वस्थ बसू शकले नाहीत. त्यांनी पुन्हा कॅमेरा किट घेतले आणि १० किलोमीटर गाडी चालवून त्याच ठिकाणी परत आले. तेव्हाही ते घुबड खाण्यात मग्न असून, धुमाळ यांनी त्याच्या नैसर्गिक हालचालींचे फोटो टिपले आणि रात्री १२ वाजता ते घरी परतले. आपल्या परिसरात ओरिएंटल स्कॉप्स घुबडाचा हा नारिंगी प्रकार पाहता येणे हा आनंददायी व अविस्मरणीय अनुभव असल्याचे धुमाळ यांनी नमूद केले.



