राज्यातील ७ कोटी फ्लॅटधारकांना मोठा दिलासा; आता प्रत्येक घराला मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून, सुमारे ७ कोटींहून अधिक घरमालकांना याचा फायदा होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २७ नोव्हेंबर : राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नवीन व्यवस्थेमुळे प्रत्येक फ्लॅटचे क्षेत्रफळ, मालकी हक्क, त्यावरील कर्जाचे बोजे आणि कायदेशीर अडचणींची नोंद स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे. राज्यातील सुमारे ७ कोटींहून अधिक सदनिकाधारकांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नोंदणी पद्धत

ग्रामीण भागात जमिनीच्या हक्कांची नोंद सातबारा उताऱ्यात, तर शहरी भूमापन क्षेत्रात मालमत्ता पत्रिकेत केली जाते. मात्र, इमारतीतील प्रत्येक सदनिकेच्या स्वतंत्र हक्कांच्या नोंदीसाठी राज्यभर एकसमान व्यवस्था नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करून नियमावलीचा मसुदा हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे. या नवीन पद्धतीत शहरी भूमापन क्षेत्रात इमारतीसाठी ‘डी-१’ आणि प्रत्येक सदनिकेसाठी ‘डी-२’, तर ग्रामीण भागात इमारतीसाठी ‘आय-ए’ आणि सदनिकेसाठी ‘आय-बी’ अशी स्वतंत्र नोंद केली जाईल.

कर्ज, बोजे आणि मालकी हक्काचा तपशील एकाच ठिकाणी

प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार असून, या कार्डवर सदनिकेचा क्रमांक, मालकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ आणि मोकळ्या जागेचा तपशील नोंदवला जाईल. यासोबतच बँकेचे कर्ज, गहाणखत, न्यायालयीन निर्बंध आणि सरकारी देणी यांचीही माहिती सदनिकानिहाय उपलब्ध होईल. जमीनमालक, विकासक, सदनिकाधारक किंवा गृहनिर्माण संस्था आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करू शकतील. पडताळणीनंतर डिजिटल स्वाक्षरीसह हे प्रॉपर्टी कार्ड वितरित केले जाणार असल्याने घर खरेदी-विक्रीचे व्यवहार अधिक पारदर्शक व सुरक्षित होतील.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!