
थेट WhatsApp वर मिळवा
सरकारी कामकाज जलद आणि पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७४ ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आल्या असून, लालफीतशाहीला आळा बसणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २७ नोव्हेंबर : राज्यातील शासकीय कामकाज अधिक जलद, सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने ‘शून्य नोकरशाही’च्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७४ डिजिटल सेवांचा शुभारंभ करण्यात आला. अनावश्यक नियम, लालफीतशाही आणि लांबलचक प्रशासकीय प्रक्रिया कमी करून नागरिकांना घरबसल्या सरकारी सेवा उपलब्ध करून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
तीन प्रमुख प्लॅटफॉर्मवर सेवा उपलब्ध
नव्याने सुरू करण्यात आलेल्या १७४ ऑनलाइन सेवांमध्ये मैत्री २.० प्लॅटफॉर्मवर ७६, आपले सरकार २.० वर ७४ आणि महाडीबीटी २.० अंतर्गत २४ सेवांचा समावेश आहे. यासोबतच डेटा-आधारित प्रशासनासाठी महासारथी प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला जाणार आहे. प्रशासकीय प्रक्रियेच्या पुनर्रचनेसाठी एकूण १,१२९ उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत ३९७ प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तसेच, २४ डिसेंबरपर्यंत आणखी काही महत्त्वाच्या सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कागदविरहित प्रशासनावर भर
सरकारी योजना व सेवांचे लाभ कमीतकमी मानवी हस्तक्षेपाने नागरिकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी वारंवार मागितली जाणारी कागदपत्रे आणि अनावश्यक प्रतिज्ञापत्रे कमी करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत ७२९ शासन निर्णय जारी करून सुमारे ३५० सेवा सुव्यवस्थित करण्यात आल्या आहेत. सर्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करून २६ जानेवारीपर्यंत नागरिकांना उत्तम व कागदविरहित डिजिटल प्रशासनाचा अनुभव द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.



