PM मोदींच्या हस्ते भोपाळमधून ५ ‘वंदे भारत’ना हिरवा झेंडा; मडगावहून मुंबईला ट्रेन रवाना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२३ । मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भोपाळ येथून ५ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अमेरिका, इजिप्त दौऱ्याहून परतलेल्या पंतप्रधान मोदींचा एकदिवसीय मध्य प्रदेश दौरा आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये भोपाळ ते इंदोर, भोपाळ ते जबलपूर, गोवा-मुंबई, बंगळुरू-हुबळी आणि पाटणा-रांची या वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मध्य प्रदेश दौऱ्यासाठी भोपाळ येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभरात धावणाऱ्या ५ वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या सोहळ्याला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत देशभरातील निवडक ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

भोपाळ येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी शहडोलला पोहोचतील. येथील वीरांगना रानी दुर्गावती बलिदान दिन गौरव यात्रेच्या भव्य समारोप समारंभास उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मध्य प्रदेशात एक कोटीहून अधिक आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे उद्घाटन करतील. यानंतर प्रत्येक गावात कार्यक्रम घेऊन कार्ड वाटप केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी सिकलसेल अॅनिमिया मिशनचा शुभारंभ करतील. शहडोलच्या पकारिया गावात जाऊन पंतप्रधान मोदी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या मान्सून मुंबई ते मडगाव या दरम्यानची वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा असेल. तर मडगावहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू राहील. मुंबई ते मडगाव या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट १८१५ रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३३६० रुपये आहे. दुसरीकडे, मडगाव ते मुंबई या मार्गासाठी वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट १९७० रुपये असून, एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३५३५ रुपये आहे.


Back to top button
Don`t copy text!