दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । भारतरत्न लतादिदींचे निधन जगात काळा दिवस म्हणून संबोधले गेले. महाराष्ट्र शासनाने दोन दिवस दुखवटा जाहिर केला. फलटण नगरितील सर्व रसिकांनी हळहळ व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अनुबंध कला मंडळ व फलटणकर रसिकांनी प. पू. उपळेकर महाराज सभागृहात श्रद्धांजली वाहण्यासाठी सायं. 5 वा. आयोजन केले होते.
ज्येष्ठ सिने समीक्षक सुलभा तेरणीकर व श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
सौ. बोबडे, सौ. पूनम भोसले यांनी दिदींची गीते सादर करून या दुःखद घटनेला सुरुवात केली.
बकुळ पराडकर यांनी मंगेशकर कुटुंब आणि फलटणचे नाते यांचा उल्लेख करताना दिदींच्या सौजन्यतेचे, आत्मियता व कौटुंबिकता अशा स्वभावाचे वर्णन करून श्रद्धांजली अर्पण केली.
प्राचार्य रवींद्र येवले यांनी दिदींच्या आवाजाची जगात असलेली जादू अल्बर्ट हॉलचे उदाहरण देवून उपस्थितींना त्यांच्या गाण्यांचे जीवन जगण्यासाठी महत्त्व विषद केले. त्यांची गाणी ऐकत ऐकत आपल्या पुढील काळात त्याचा आनंद घेऊ हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सुलभा तेरणीकरांनी आपले आणि दिदी यांचे असलेले स्नेहसंबंध त्यातून त्यांना आलेले सुखद प्रसंग भावनावश होऊन व्यक्त केले. श्रीमंत सुभद्राराजे यांनी त्यांची गाणी, फलटण राजघराण्याशी असलेले विशेषतः श्रीमंत रामराजेंचे आणि दिदींचे संबंध यावर भाष्य करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी दिदींविषयीच्या भावना अत्यंत मोजक्या शब्दात व्यक्त केल्या आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. लायन भोजराज नाईक निंबाळकरांनी दिदींविषयी भावना व्यक्त करताना त्यांच्या स्वरांचे महत्त्व आणि सर्व विषयाला धरून गायलेल्या गाण्यांचे वर्णन केले. लायन्स क्लबतर्फे आदरांजली वाहिली.
सिनेसृष्टीचे अभ्यासक उस्मान शेख यांनी श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. प्रारंभी अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष अरुण भोईटे यांनी प्रथम दिदींच्या फोटोला हार घालून मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली. चाहत्यांची उपस्थिती दिदींवरील प्रेम सांगून गेली.