प्रभाग क्र. ८ मधील शेकडो महिलांची अक्कलकोट-पंढरपूर दर्शनयात्रा उत्साहात संपन्न; अनुप शहा व कु. सिद्धाली शहा यांच्या पुढाकाराने महिलांना घडले प्रथमच दर्शन!

फलटण प्रभाग ८ च्या शेकडो महिलांसाठी आयोजित अक्कलकोट व पंढरपूर दर्शनयात्रा उत्साहात पार पडली. अनुप शहा व सिद्धाली शहा यांच्या पुढाकाराने ही यात्रा काढली.

स्थैर्य, फलटण, दि. १८ जून : फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील शेकडो महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली अक्कलकोट व पंढरपूर येथील धार्मिक दर्शनयात्रा नुकतीच अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. माजी नगरसेवक अनुप शहा आणि विद्यमान नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या विशेष पुढाकारातून आणि नियोजनातून ही भव्य यात्रा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

अनेक महिलांचे प्रथमच दर्शन:

या दर्शनयात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात सहभागी झालेल्या बहुतांश महिला या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील होत्या. यापैकी अनेक महिलांच्या आयुष्यात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि पंढरपूरचे दर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ होती. अनुप शहा आणि कु. सिद्धाली शहा यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळेच आपल्याला पहिल्यांदाच या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडले, अशी कृतज्ञतेची भावना या महिलांनी व्यक्त केली. आपल्या लाडक्या दैवतांचे दर्शन सुखकररीत्या घेता आल्याने सर्व महिला भाविकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि समाधान पाहायला मिळत होते.

मान्यवरांचे खंबीर नेतृत्व आणि मार्गदर्शन:

हा लोकोपयोगी आणि धार्मिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या संपूर्ण दर्शनयात्रेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.

प्रभागातील महिलांना दैनंदिन कामातून विरंगुळा मिळावा आणि त्यांना आध्यात्मिक आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने शहा पिता-कन्येने (अनुप शहा व कु. सिद्धाली शहा) राबवलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण फलटण शहरातून आणि विशेषतः प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांकडून मोठे कौतुक केले जात आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल यात्रेत सहभागी महिलांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Back to top button
Don`t copy text!