
फलटण शहरातील कोळकी परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ४१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १८ जून : फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोळकी परिसरामध्ये एका अपार्टमेंटवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा टाकून 37 हजार 965 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या साठ्यामुळे आता गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदनिकेवर छापा आणि मुद्देमाल जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांना कोळकी येथील ‘मोनिता संस्कृती अपार्टमेंट’मधील फ्लॅट नंबर २ मध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १७ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी आणि पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा, तुलसी जर्दा आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 37 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयितावर गुन्हा दाखल
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी किरण शशिकांत दोषी (रा. कोळकी, फलटण) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत विविध गुटखा उत्पादक कंपन्यांच्या मालक आणि भागीदारांचाही संशयित म्हणून समावेश करण्यात आला आहे.
मोक्का लागणार का? याकडे लक्ष
महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठा आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही फलटण शहर व परिसरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी आणि विक्री सुरू असल्याचे या कारवाईवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. या बेकायदेशीर व्यवसायातील संघटित साखळी मोडून काढण्यासाठी पोलीस आता संबंधित संशयितांवर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करणार का, अशी चर्चा नागरिक व राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.