फलटण: १३ लाखांचा टँकर चोरणारे दोघे २४ तासांत जाळ्यात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

पाडेगाव येथून १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर चोरणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत अटक करून टँकर जप्त केला.

स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्र परिसरातून चोरलेला १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर २४ तासांच्या आत हस्तगत करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा टँकर जप्त करण्यात आला आहे.

विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधताना कारवाई

पाडेगाव येथून सगुणामाता कन्स्ट्रक्शन कंपनीचा पाण्याचा टँकर अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लिंबखिंड परिसरातील सर्व्हिस रोडवर दोन तरुण टँकर विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी लिंबखिंड येथे धाड टाकून बनावट कागदपत्रांची उत्तरे देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पाडेगाव येथून आपल्या एका साथीदाराच्या मदतीने टँकर चोरल्याची कबुली दिली.

दोघे संशयित ताब्यात

या कारवाईत पोलिसांनी अनिकेत सुनील लकडे (वय २५, रा. लकडे वस्ती, पाडेगाव, ता. फलटण) आणि शुभम विनोद जैस्वाल (वय १८, रा. दगडे वस्ती, निरा, ता. पुरंदर) या दोन संशयितांना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.

Back to top button
Don`t copy text!