
थेट WhatsApp वर मिळवा
जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाकडून ५९ गावे व ३२२ वाड्यांना ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १२ नोव्हेंबर : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांतील ५९ गावे व ३२२ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील ७९ हजार ६४५ नागरिक आणि ६४ हजार ९४७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
फलटण तालुक्यात पाणीपुरवठा
फलटण तालुक्यातील ३ गावे आणि २ वाड्यांमधील १ हजार ७७४ नागरिक व २८० पशुधनासाठी प्रशासनाने १ खाजगी टँकर सुरू केला आहे. वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
माण आणि खटावची स्थिती
माण तालुक्यातील ४५ गावे आणि २६९ वाड्यांतील ६४ हजार ४५४ नागरिक व ५८ हजार पशुधनाला टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. खटाव तालुक्यातील ११ गावे आणि ५१ वाड्यांमधील १३ हजार ४१७ नागरिक व ६ हजार ६६७ पशुधनासाठी ७ खाजगी टँकर सुरू आहेत.
प्रशासनाचे नियोजन
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या एकूण ५२ टँकरमध्ये १ शासकीय आणि ५१ खाजगी टँकरचा समावेश आहे. या टँकरसाठी १०९.७२ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने ११ विहिरी आणि १० बोअरचे अधिग्रहण केले आहे.





