
थेट WhatsApp वर मिळवा
राजाळे गावातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तोरसे यांनी दिवाळीनिमित्त ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याची हुबेहूब आणि आकर्षक प्रतिकृती साकारली असून, या उपक्रमामुळे शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
स्थैर्य, राजाळे, दि. १२ नोव्हेंबर : दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा दैदिप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राजाळे गावातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तोरसे यांनी या वर्षी ऐतिहासिक ‘सिंहगड (कोंढाणा)’ किल्ल्याची अत्यंत आकर्षक व हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. शिवछत्रपतींच्या आणि तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी राजाळे व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ आणि बाल-गोपाळांची मोठी गर्दी होत आहे.
किल्ल्याची आकर्षक रचना
दत्तात्रय तोरसे यांनी अत्यंत सुबकपणे किल्ल्याचे बुरुज, प्रवेशद्वार म्हणजेच पुणे दरवाजा व कल्याण दरवाजा, तटबंदी आणि मावळ्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. गड-किल्ल्यांची ही परंपरा केवळ मनोरंजनासाठी नसून आपल्या गौरवशाली इतिहासाची स्मृती जपण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये संस्कृतीबद्दल आवड निर्माण करण्यासाठी आहे, असा संदेश या उपक्रमातून त्यांनी दिला आहे. तोरसे यांच्या या कौतुकास्पद व मार्गदर्शक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.
सिंहगडाचा ऐतिहासिक वारसा
पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या सिंहगड किल्ल्याला (पूर्वीचे नाव कोंढाणा) ऐतिहासिक महत्त्व आहे. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी सोपवली होती. या साहसी मोहिमेत तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, परंतु मराठ्यांनी किल्ला जिंकला. तानाजींच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी “गड आला, पण सिंह गेला!” असे उद्गार काढत या वीरांच्या स्मृती जपल्या होत्या.





