
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणमधील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार सचिन पाटील यांनी १८ साठवण योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. १६ ऑक्टोबर : अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू दिले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी १८ पाणी साठवण योजनांचा आढावा घेतल्यानंतर दिली.
साठवण तलावांची प्रत्यक्ष पाहणी
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागांतर्गत तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांच्या कामांची आणि पाणीसाठ्याची पाहणी केली. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे या तलावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. विडणी, निंबलक, पिंप्रद, राजाळे, सोमंथळी, गिरवी, धुळदेव आणि वाठार निंबाळकर येथील पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे या पाहणीत निदर्शनास आले.
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
सोनगाव आणि सरडे येथील साठवण तलावांना अद्याप विद्युतपुरवठा जोडलेला नसल्याने ते रिकामे आहेत, तर शिंदेवाडी येथील तलावाच्या कामात विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम प्रलंबित असल्याचे समोर आले. यावर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच होळ-खामगाव, निंभोरे, सस्तेवाडी आणि ठाकूरकी-फरांदवाडी येथील प्रगतिपथावर असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.





