फलटण: वीर धरण १०० टक्के भरले – नीरा नदीत ८ हजार क्युसेक विसर्ग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

नीरा खोऱ्यातील वीर धरण १०० टक्के भरले असून नीरा नदीसह कालव्यात ८ हजार ११४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा.

स्थैर्य, फलटण, दि. २६ जुलै : नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे वीर धरण १०० टक्के भरले असून, धरणातून नीरा नदीपात्रात आणि कालव्यांमध्ये एकूण ८ हजार ११४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, वीर धरणात ९.४०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. याशिवाय नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक आणि उजव्या कालव्यातून १ हजार ५५० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

नीरा खोऱ्यातील इतर प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भाटघर धरणात १८.६७९ टीएमसी म्हणजेच ७९.४७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. नीरा देवघर धरणात ९.९६३ टीएमसी (८४.९४ टक्के) साठा उपलब्ध आहे. गुंजवणी धरण ८६.९९ टक्के भरले असून तेथून कानंदी नदीपात्रात २ हजार ५५३ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे नदीपात्रातील विसर्गात गरजेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते. प्रशासनाने नीरा नदीकाठच्या सर्व नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आणि नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button
Don`t copy text!