
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील सोमवार पेठेत फटाके उडवताना पिशवीला आग लागून ९० टक्के भाजलेल्या अडीच वर्षांच्या समर पवार या चिमुकल्याचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.
स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फटाके उडवत असताना हातातील पिशवीत ठिणगी पडून सुमारे ९० टक्के भाजलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याचे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी फलटण शहरातील सोमवार पेठेत ही भयंकर दुर्घटना घडली होती. या लहानग्याच्या मृत्यूमुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
पाच ते सहा दिवसांपूर्वी सोमवार पेठ परिसरात राहणारा अडीच वर्षांचा समर विशाल पवार हा घरासमोर फटाके उडवताना पाहत होता. त्याच्या एका हातात फटाक्यांनी भरलेली पिशवी होती. याचवेळी त्याच्या दुसऱ्या हातात एक पेटवलेली तारकडी देण्यात आली होती. या पेटलेल्या तारकडीची ठिणगी चुकून फटाक्यांनी भरलेल्या पिशवीत पडली आणि पिशवीतील सर्व फटाक्यांनी अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत समर ९० टक्क्यांहून अधिक भाजला गेला होता.
उपचारांची शर्थ, पण मृत्यूची झुंज अपयशी
गंभीर भाजलेल्या अवस्थेत समरला सुरुवातीला उपचारांसाठी बारामती येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, भाजण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयात वैद्यकीय पथकाकडून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अनेक दिवसांच्या संघर्षानंतर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.





