
थेट WhatsApp वर मिळवा
राजाळे गावातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित भव्य किल्ले स्पर्धा-२०२६ मध्ये बालशिलेदारांनी मातीतून अप्रतिम किल्ले साकारत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्साहात सादर केला.
स्थैर्य, राजाळे, दि. १५ नोव्हेंबर : मोबाईलच्या युगात नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची गोडी लागावी, या उद्देशाने राजाळे येथे ‘भव्य किल्ले स्पर्धा-२०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत ३० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत मातीतून अभ्यासपूर्ण आणि आकर्षक किल्ले साकारले.
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बालशिलेदारांनी केवळ किल्ले बनवले नाहीत, तर अत्यंत आत्मविश्वासाने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने संबंधित किल्ल्यांचा इतिहास सादर केला. मुलांची कल्पकता आणि इतिहास जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता उपस्थितांच्या मनाला भावून गेली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे गड-किल्ल्यांचा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्पर्धेचे मानकरी आणि विजेते
या स्पर्धेत ग्रुप आणि वैयक्तिक असे दोन गट करण्यात आले होते. ग्रुप स्पर्धेत जय हनुमान मित्र मंडळ (जाधव वस्ती) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक छत्रपती श्री शिवाजी नगर व नवचैतन्य मित्र मंडळ (शेडगेनगर) आणि तृतीय क्रमांक शिव वेताळ तरुण मंडळ (राजाळे) यांनी मिळवला. वैयक्तिक स्पर्धेत विघ्नेश भोईटे व अथर्व तोरशे यांनी प्रथम क्रमांक, गणेश वाघ व श्रेयस काकडे यांनी द्वितीय, तर हर्ष शिंदे व विराज ननवरे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजयी स्पर्धक व मार्गदर्शक पालकांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.





