
थेट WhatsApp वर मिळवा
सैबेरियाहून आफ्रिकेला जाणाऱ्या आणि २२ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या दुर्मिळ अमूर फाल्कन पक्ष्याची फलटण तालुक्यात प्रथमच नोंद झाली असून, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : जगातील सर्वात लांब स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असलेला अमूर फाल्कन पक्षी नुकताच फलटण तालुक्यात आढळून आला आहे. फलटण तालुक्यात या पक्ष्याची ही पहिलीच नोंद असून, यामुळे सातारा जिल्ह्याच्या पक्षी निरीक्षणाच्या इतिहासात एका नव्या पानाची भर पडली आहे.
सैबेरिया आणि उत्तर चीनमध्ये प्रजनन करणारा हा छोटासा शिकारी पक्षी दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. या प्रवासात तो भारतामार्गे जातो. आतापर्यंत हा पक्षी मुख्यत्वे नागालँड, मणिपूर आणि आसाममध्ये मोठ्या थव्याने दिसत होता. मात्र, आता तो फलटणमध्ये आढळल्याने त्याच्या स्थलांतर मार्गाबद्दल नव्याने संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पक्षी निरीक्षकांची कामगिरी
गणेश धुमाळ आणि रवी लिपारे या पक्षी निरीक्षक व वन्यजीव चित्रकार मंडळींनी फलटण परिसरात हा पक्षी पाहिला आणि त्याचे छायाचित्रण केले. सुरुवातीला तो सामान्य बाज वाटला, मात्र त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंग, आकार आणि उडण्याच्या पद्धतीवरून तो अमूर फाल्कन असल्याचे निष्पन्न झाले. अमूर फाल्कन हा आकाराने फक्त २७ ते ३० सें.मी. असून त्याचे वजन केवळ १२० ते १५० ग्रॅम असते. हा पक्षी प्रामुख्याने कीटक खात असल्याने शेतीसाठी मित्र पक्षी मानला जातो.
फलटणमध्ये पक्षी दिसण्याचे महत्त्व
अमूर फाल्कन सहसा ईशान्य भारतातून जातो. तो पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः फलटणसारख्या दुष्काळी पट्ट्यात दिसणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. हवामान बदलामुळे स्थलांतर मार्गात बदल होत असावा किंवा हा पक्षी मुख्य थव्यापासून भरकटून इकडे आला असावा, असा अंदाज आहे. परिसरातील माळरान, तलाव आणि कीटकांची उपलब्धता त्याला थांबण्यासाठी पोषक ठरली असावी. या नोंदीमुळे फलटण तालुका राज्याच्या पक्षी नकाशावर आला आहे.





