
फलटणमध्ये एका पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तीन संशयित आरोपींना एका तासाच्या आत अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १६ जुलै : फलटण शहरातील रिंगरोड परिसरात एका पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन संशयित आरोपींना एका तासाच्या आत अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. संतोष आनंदराव होळकर (वय ४५), संदीप आनंदराव होळकर (वय ४२) आणि दीपक लाला जाधव (वय ४३, सर्व रा. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या तिन्ही संशयित आरोपींचा शोध घेतला. त्यांना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने संशयितांना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाजरे करत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे, पोलीस अंमलदार संतोष कदम, संतोष नाळे आणि जितेंद्र टिके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
