
फलटण तालुक्यात यंदा सरासरीच्या १२३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण २१५ मिमी पाऊस झाला असून, तरडगाव मंडळात सर्वाधिक तर गिरवी मंडळात सर्वात कमी पाऊस पडला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : फलटण तालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, आतापर्यंत सरासरीच्या १२३.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण तालुक्यात एकूण २१५.० मिलीमीटर पाऊस पडला असून, सर्वाधिक पाऊस तरडगाव मंडळात नोंदवला गेला आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, जून महिन्यापासून आतापर्यंत फलटण तालुक्यात १७३.९ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित होती. त्या तुलनेत तालुक्यात २१५.० मिमी पाऊस झाला आहे. पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली असून, शेतीकामांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
मंडळनिहाय पावसाची स्थिती
तालुक्यातील विविध मंडळांमध्ये पावसाची स्थिती वेगवेगळी आहे. तरडगाव मंडळात सर्वाधिक ३१३.२ मिमी पाऊस झाला आहे, जे सरासरीच्या १८० टक्के आहे. त्यापाठोपाठ होळमध्ये २६४.२ मिमी आणि बरड मंडळात २२८.३ मिमी पाऊस पडला आहे. उर्वरित आसू मंडळात २१३.२ मिमी, वाठार २०५.९ मिमी, कोळकी १९७.० मिमी, राजळे १९३.७ मिमी, आदरकी १९०.० मिमी आणि फलटण शहर मंडळात १७७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गिरवी मंडळात मात्र सर्वात कमी १५८.५ मिमी पाऊस झाला आहे.
