
दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२६ | सातारा |
लोधवडे (ता. माण) येथील वृद्ध दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या संशयितांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या सातजणांबरोबर एका विधिसंघर्ष बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून चोरीचे सोन्याचे दागिने, हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा तब्बल ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोधवडे (ता. माण) येथील एका वस्तीच्या परिसरात नारायण बीरा चोपडे (वय ६६) हे कुटुंबासह राहतात. १० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे दोनच्या सुमारास काही अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. हातातील हत्यारे दाखवत घरातील व्यक्तींना धमकावून गप्प बसवण्यात आले. त्यानंतर संशयितांनी नारायण चोपडे यांच्या पत्नी तुंगाबाई लोधवडे यांच्याकडे पेटी व कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. चाव्या देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी धमकावून चाव्या हिसकावून घेतल्या.
घरातील सोन्याची मोहनमाळ, राणीहार, कर्णफुले तसेच अन्य सोन्याचे दागिने लुटले. एवढ्यावरच न थांबता तुंगाबाई यांच्या गळ्यातील सोन्याच्या मणिमंगळसूत्रातील मणीही हिसकावून तोडून नेले. या दरोड्यात सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. घटनेनंतर दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संशयितांचा माग काढत सात संशयितांसह एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान माहितीनंतर दरोड्यातील चोरीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.