
दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२६ | पुणे |
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून मोठ्या कारवाया सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट जेवण, गुटखा विक्रीवर छापे अशा अनेक मोठ्या कारवाया एफडीएकडून करण्यात आलेल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज कारवायांमुळे आणि कामांमुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. आता तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना आणखी एक मोठा इशारा दिला. राज्यातील ‘चायनीज फूड स्टॉल’ आता एफडीएच्या रडारवर असणार आहेत.
यासंदर्भात बोलताना खुद्द तुकाराम मुंढे यांनीच इशारा दिला आहे. ‘आता चायनीज फूडकडेही थोडं लक्ष द्यायचं आहे’, असं सूचक भाष्य तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित मुलाखतीत बोलताना केलं. त्यामुळे आता चायनीज फूड स्टॉलवर अन्नपदार्थ सुरक्षेच्या नियमांचं पालन होत आहे की नाही? याची तपासणी एफडीएकडून केली जाण्याची शक्यता आहे.
जुन्या आठवणी सांगताना तुकाराम मुंढे यांनी म्हटलं की, आधी पुण्यातील बापट रोड किंवा पाषाण रोडवर चायनीजच्या गाड्या असायच्या. मी असा विचार करतोय की आता तिथे जाऊन जरा बघावं का? तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज फूड तिथेच खाल्लेलं आहे. अन्यथा तोपर्यंत चायनीज फूड काय आहे, हे मलादेखील माहिती नव्हतं. भारत-चीन युद्ध वैगेरे असा अभ्यास मी केला होता. मात्र, चायनीज फूडचा असा कोणता अभ्यास केला नव्हता. पण आता चायनीज फूडचीही खूप डिमांड आहे. गेल्या दोन महिन्यांत एफडीएकडून खूप कारवाया झालेल्या आहेत. त्यामुळे लोक मला सांगत आहेत की, चायनीज फूडकडेही थोडं लक्ष द्या. त्यामुळे आता चायनीज फूडकडेही थोडं लक्ष द्यायचं आहे, असा सूचक इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.
सेवन करण्यामध्ये दारूदेखील येते. मग तुम्ही फक्त खाद्य पदार्थांवरच कारवाया का करता? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आणखी एक इशारा दिला. ते म्हणाले की, दोन्ही ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोल ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स या दोन्हीही माझ्या अधिकारात येतात. त्याची कॉलिटी, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं लेबलिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी ज्या काही प्रतिक्रिया आहेत. तेदेखील एफडीएच्या अधिकारात येतात. आता तेदेखील लाईनमध्ये आहे. सध्या जरा जास्त काम आहे. मात्र, याबाबतदेखील काही प्लॅन केलेले आहेत, असा सूचक इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.