महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ; फलटणमध्ये ‘Sunday SHG Mart’ सुरू

फलटण नगरपरिषदेने महिला बचत गटांसाठी ‘Sunday SHG Mart’ आठवडी बाजार सुरू केला आहे. महिलांच्या उत्पादनांना विक्रीची संधी देत रोजगाराला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २३ ऑगस्ट : महिला बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी फलटण नगरपरिषदेच्या प्रांगणात ‘Sunday SHG Mart’ या आठवडी बाजाराची सुरुवात करण्यात आली. आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले.

महिलांच्या रोजगारासाठी उपक्रम

आमदार सचिन पाटील म्हणाले, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. आगामी काळातही नगरपरिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महिलांनी गृहउद्योगातून तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी नगरपरिषद यापुढेही सहकार्य करेल.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!