
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला शासकीय कामात अडथळा आणून कॉलर धरून धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ जुलै : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला शासकीय कामात अडथळा आणून, कॉलर धरून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्र परवान्याच्या फिट फॉरमॅटवरून वाद
आरोग्य अधिकारी राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना संशयित प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख (रा. जावली, सातारा) आणि त्यांच्यासोबत आलेले अन्य काही व्यक्ती केसपेपर घेऊन आले. त्यांनी शस्त्र परवान्यासाठी (गन लायसन्स) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, ओपीडीची वेळ संपली असल्याने आणि ईसीजी व बीपी तपासणीनंतर मानसोपचार तज्ज्ञांचे मत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तसेच, संबंधित व्यक्तींनी वैद्यकीय अधीक्षक यांचा मोबाईल नंबर मागितला असता, ओपीडी वेळेनंतर नंबर देणे नियमात बसत नसल्याने डॉक्टरांनी तो देण्यास नकार दिला. त्यानंतर उपस्थितीत संभाषण सुरू असताना संशयितांनी अरेरावी व दमदाटी करण्यास सुरुवात केली.
कॉलर धरून मारहाणीची धमकी
वादादरम्यान संशयितासोबत असलेल्या काळ्या रंगाचा सफारी ड्रेस घातलेल्या व्यक्तीने वैद्यकीय अधिकारी रुपनवर यांच्या अंगावर धावून जात त्यांची कॉलर धरली. त्यांना दरवाजाकडे ओढत नेऊन धक्काबुक्की केली आणि ‘मार दूंगा’ तसेच ‘उद्या सकाळी तुला समजेल मी कोण आहे’ अशी धमकी दिली.
या प्रकरणी राजेंद्र रुपनवर यांच्या फिर्यादीवरून प्रसाद प्रदीप कोंडे – देशमुख व काळी सफारी घातलेला अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गजरे करत आहेत.