वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी फलटणमध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू : नगराध्यक्ष समशेरसिंह यांची माहिती

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी फलटण नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०१ जुलै : आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने, या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) करण्याची मोहीम नगरपरिषदेने हाती घेतली आहे.

अद्ययावत केंद्रात कुत्र्यांवर उपचार

शहरातील कचरा डेपो येथे निर्बीजीकरणासाठी भव्य आणि सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी एकाच वेळी ५० ते १०० कुत्र्यांची सोय होऊ शकते. प्रत्येक कुत्र्यासाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. कोणत्याही कुत्र्याला आजार असल्यास, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच सर्व कुत्र्यांना नसबंदीसह रेबीज प्रतिबंधक लसही दिली जात आहे.

नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा

निर्बीजीकरणानंतर कुत्री पूर्णपणे शांत होत असल्याने त्यांच्याकडून नागरिकांना आणि वारकऱ्यांना होणारा त्रास टळणार आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सुरू झालेली ही मोहीम सोहळ्यानंतरही शहरात सुरू ठेवली जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Back to top button
Don`t copy text!