नगराध्यक्ष सभागृहात आल्यावर सर्वांनी उभे राहून सन्मान राखलाच पाहिजे; नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांचे खडे बोल!

फलटण नगरपरिषदेच्या सभेत नगराध्यक्ष सभागृहात आल्यावर सर्वांनी उभे राहून त्यांचा सन्मान करावा, या शिष्टाचाराकडे नगरसेविका सिद्धाली शहा यांनी लक्ष वेधले.

स्थैर्य, फलटण, दि. ०१ जुलै : फलटण नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेमध्ये विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन आणि त्यांना मंजुरी देण्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर, नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी सभागृहाच्या शिष्टाचाराबाबत एक अत्यंत महत्त्वाचे मत व्यक्त केले. त्यांच्या या रास्त भूमिकेला खुद्द नगराध्यक्षांनीही आपला दुजोरा दिला आहे.

काल पार पडलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला, नगराध्यक्ष सभागृहात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ केवळ मोजकेच सदस्य आणि अधिकारी जागेवर उभे राहिले. ही बाब नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांच्या निदर्शनास आली.

सभेतील सर्व अधिकृत कामकाज संपल्यानंतर आपले परखड मत व्यक्त करताना कु. सिद्धाली शहा म्हणाल्या की, “नगराध्यक्ष हे शहराचे प्रथम नागरिक असतात. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रोटोकॉलनुसार (शिष्टाचारानुसार) जेव्हा नगराध्यक्ष सभागृहामध्ये प्रवेश करतात, तेव्हा सभागृहातील सर्वच सदस्यांनी आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी जागेवरून उठून त्यांना आदरपूर्वक सन्मान (रिस्पेक्ट) देणे अत्यंत आवश्यक आहे.”

सभागृहाची आणि नगराध्यक्ष या सर्वोच्च पदाची गरिमा राखण्यासाठी या शिष्टाचाराचे सर्वांनी तंतोतंत पालन केले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. कु. सिद्धाली शहा यांनी मांडलेल्या या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेत, खुद्द नगराध्यक्षांनीही त्यांच्या या मताला दुजोरा दिला. कु. सिद्धाली शहा यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे पालिका वर्तुळात या शिष्टाचाराची चांगलीच चर्चा रंगली असून, आगामी सभांमध्ये या प्रोटोकॉलचे काटेकोर पालन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button
Don`t copy text!