
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणमध्ये भटक्या कुत्र्यांनी ३ महिन्यांच्या चिमुरडीचा बळी घेतल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. पालिका आणि प्राणीमित्र गप्प का? भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १० नोव्हेंबर : फलटण शहरातील महात्मा फुले चौकात आई-वडिलांसोबत झोपलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेला भटक्या कुत्र्यांनी ओढून नेत तिचा बळी घेतल्याची घटना अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी आहे. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून, बळी गेलेली ‘ती’ चिमुरडी पारधी समाजाची असल्यामुळेच प्रशासन आणि स्वतःला ‘प्राणीमित्र’ म्हणवून घेणारे गप्प आहेत का? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.
कथित प्राणीमित्र आता कुठे लपलेत?
भटक्या कुत्र्यांवर कारवाईची वेळ आली की, रस्त्यावर उतरून गळा काढणारे कथित प्राणीमित्र आज कुठे लपून बसले आहेत? एका निष्पाप तीन महिन्यांच्या बालिकेला भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः ओरबाडून मारले, त्या कुटुंबाचा आक्रोश या प्राणीमित्रांना ऐकू येत नाही का? कुत्र्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांनी आता त्या मृत बालिकेच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंचीही जबाबदारी घ्यावी. केवळ सोशल मीडियावर प्राणीप्रेमाचा उदोउदो करणाऱ्यांनी आता मानवी जीवाचे मूल्यही समजून घेण्याची गरज आहे.
पारधी समाजाचे कुटुंब म्हणून दुर्लक्ष?
बळी गेलेली चिमुरडी ही वाठार फाटा येथील मजुरी करणाऱ्या पारधी कुटुंबातील होती. त्यामुळेच या गंभीर घटनेकडे सर्वांनी सोयीस्कररीत्या डोळेझाक केली आहे का? हाच प्रसंग जर उद्या तुमच्या-आमच्या घरात खेळणाऱ्या एखाद्या मुलाच्या बाबतीत घडला असता, तर प्रशासनाने आणि समाजाने एवढीच शांतता बाळगली असती का? मुले घराबाहेर खेळत असतात, त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवणे शक्य नसते. रात्री घडलेली ही भयंकर घटना भरदिवसा किंवा सायंकाळीही घडू शकते, याचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे.
नगरपरिषदेने कोणाचीही भीडभाड न ठेवता कारवाई करावी
फलटण नगरपरिषदेने काही महिन्यांपूर्वी भटकी आणि मोकाट कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम हाती घेतली होती. मात्र, ती मोहीम पुन्हा प्रभावीपणे राबवणे आता गरजेचे बनले आहे. एका बालिकेचा बळी गेल्यानंतर आता नगरपरिषदेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता, मोकाट कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा. प्रशासनाने आता बघ्याची भूमिका सोडून तातडीने कठोर पावले न उचलल्यास, उद्या आणखी एखाद्या निष्पाप जिवाला नाहक आपला जीव गमवावा लागेल.





